शुक्रवार, २२ जानेवारी, २०१६

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व

                  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे हिंदुत्व

                      

           हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व 
                                           :-स्वा.वि.दा.सावरकर

      सध्या तथाकथित पुरोगामीचे पिक मोठ्याप्रमाणात उगवलेल आहे. बुद्धीजीवी, समाजवादी असे सर्व  शब्द कानावर पडत असतात . देशात वाढलेली असहिष्णुतेला विरोध करण्यासाठी हे सर्व सेक्युलर लोक पुढे येत असल्याचा आव आणत आहेत. हे सर्व घडत असताना सावरकर हे नाव हि निघत असताना दिसते . मग पुरोगामी आपल्या स्वार्थ साधण्यासाठी ,तसेच राजकीय पक्ष राजकारणासाठी सावरकरांचे नाव घेताना दिसतात. कोणी म्हणत सावरकर राष्ट्रभक्तनसून धर्मांद होते, तर कोणी म्हणत सावरकरांनी देशासाठी काय केल आहे? त्यात भर ती ‘बि’ग्रेडी बुद्धीजीवींची. हे स्वयम घोषित इतिहासकार खोटा इतिहास लिहून जातीय द्वेष पसरवताना दिसत आहेत.
   परंतु सावरकरांचे हिंदुत्व हे धर्मावर आधारित नसून राष्ट्रवादावर आधरलेलं आहे.  अंदमानच्या तुरुंगात  काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना काही मुसलमान कैदी म्हणून अंदमानात येत ते  त्यांनी खिलापत चळवळीचे प्रतिनिधित्व केल्यामुळे. आमच्या खलिफा विरुध्द युद्ध करण्याचा प्रयत्न ब्रिटन करूच कसा शकतो हा त्या मुसलमानाचा समज होता त्यासाठी त्यांनी खिलापत चळवळ हाती घेतली होती  हि गोष्ट सावरकरांच्या मनाला खटकत असे. कारण हा खलिफा  प्रश्न भारतीय मुसलमानांसाठी राष्ट्रीय नव्हता तर धार्मिक होता. कारण तुर्कस्तानचा खलिफा त्याचा धार्मिक राजा होता , कोण कुठला तुर्कस्तान कुठला तो खलिफा त्याच्या विषयी ह्यांच्या मनात इतक प्रेम व त्यासाठी आपल संपूर्ण आयुष्य अर्पण करण्यास तयार , परंतु आपली जन्मभू ,मात्रुभू , माझादेश पारतन्त्र्यात खितपत आहे त्याला स्वातंत्र्य करण्यासाठी आपण काही तरी कराव अस त्यांना किंचितही वाटत नाही हे  पाहून सावरकरांना दुखः होत असे.कारण भारतापेक्षा तुर्कस्थान त्यांना पुण्यभूमी वाटते व तुर्कस्थानचा खलिफा त्यांच्यासाठी भारताच्या स्वातंत्र्यापेक्षा महत्वाचा वाटतो. ह्यातूनच पुढे मोपल्याचे बंड सारखे प्रकार घडले व खिलापत चळवळीचे रुपांतर भयानक हिंसेत होऊन मलबार मधील मुसलमानांनी हिंदुवर अत्याचार केले. ह्याच विचाराने व्याकुळ  पुढे सावरकरांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहला, त्या ग्रंथाची रूपरेषा अंदमानातील तुरुंगातच तयार केली व तुरुंगातून बाहेर येताच रत्नागिरीत  हा ग्रंथ लिहुन पूर्ण केला. आधुनिक भारतात  राष्ट्रीय हिंदुत्वाचे तत्वज्ञान मांडणारे स्वतंत्र्यवीर सावरकर पहिले तत्वज्ञ होत. 
                आसिंधु सिंधुपर्यन्ता यस्य भारतभूमिका |
                पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिती स्मृतः|| 

    ज्याची पितृभूमी आणि पुण्यभूमी भारत भूमी आहे तो हिंदु. जो सिंध पासून बंगाल पर्यंत आणि काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतची सर्वभूमी हि पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदु. ह्या देशात जोजो राहतो व ज्याचे ज्याचे पूर्वज भारतात जन्मले आयुष्य जगले आणि मृत्यू पावले त्या सार्वांची पितृभूमी हि भारत भूमीच आहे.परंतु केवळ पितृभूमी भारत भूमी असल्याने कोणी हिंदु होऊ शकत नाही पितृभूमी बरोबरच ज्याची पुण्यभूमी हि भारत आहे तो हिंदु.  ह्या व्याखेनुसार ज्याज्या पंथांचा उदय भारतात झाला आहे त्यात्या पंथाचे अनुयायी हिंदु आहेत. उदा :- वैदीक, बौध्द, जैन , शीख , लिंगायत ,आर्यसमाजी हे सारे  हिंदु होत .कारण ह्या सर्वांचे पूर्वज भारतच जीवन जगले असल्यामुळे  ह्या सर्वांची पितृभूमी भारत आहेच त्याच बरोबर ह्या सर्व पंथाचा उदय भारतात झाला असून ह्या पंथातील अनुयायी वर्गाची पुण्यभूमी (holyland) भारत आहे .परंतु  ह्यामध्ये क्रिस्ती मुस्लीम व पारशी ,ज्यू ह्या पंथांचा समावेश सावरकरांनी केलेला नाही आहे. कारण क्रिस्ती तसेच मुसलमानांचे पूर्वज ह्याच राष्ट्रात जन्मले म्हणून त्यांची पितृभूमी भारत आहे  परंतु  आज हि आपण एखाद्या क्रिस्ती युवकास विचारल की जगात सर्वात पवित्र काय आहे तर ते चटकन रोम म्हणतील , किंवा एखाद्या मुसलमानास विचारल की ह्या जगात पवित्र काय आहे तर तो चटकन मक्का सांगेल. म्हणून त्यांची पुण्यभूमी भारत नसल्याने ते हिंदु ठरत नाहीत. 
            खर पाहिलतर भारत हा सर्व समावेशक राष्ट्र आहे. दोन सहस्त्र पेक्षा जास्त वर्षाच्या काळापासून अनेक धर्म व पंथ भारतात जन्मास आले तसेच अनेक पंथ परदेशातून भारतात आले त्या सर्व पंथांना भारतानी सामावून घेतले. परंतु परदेशातून भारतात आलेले काही पंथ राष्ट्रीयत्वाला घातक ठरले. ज्यू तसेच पारशी भारतात आले राहिले परंतु त्यांनी त्यांच्या पंथ वाढविण्याची महत्वकांक्षा मनात धरली नाही व ते भारतीय संस्कृतीस अनकूल झाले व हिंदु संस्कृतीने त्यांना सामावून घेतले .परंतु मुसलमान किंवा क्रिस्ती पंथ ह्या मातीच्या संस्कृतीशी सामावून न घेता परकीय संकृती ह्या देशात लादण्याचा प्रयत्नात राहिले. ह्यातूनच पुढे विलप्त राष्ट्रवादाची भूमिका वाढीस लागली व ज्यांची पुण्यभूमी भारत भूमि नाही त्यांनी वेगळ्या राष्ट्रची मागणी केली. पाकिस्तान हे ह्यांचे सर्वात मोठे उदाहरण होते कारण सिंध, पंजाब, पूर्व बंगालमधील लोकांच्या पूर्वजांची पितृभूमी आसिंधु-सिंधूच होती परंतु हि आसिंधु-सिंधू पुण्यभूमी नसल्याने विलप्त राष्ट्रवाद वाढीस लागला व पाकीस्थानच्या मागणीचा जोर वाढीस लागला व भारतातून विलप्त होण्यासाठी त्यांनी अनेक भयानक प्रकारही चालवले . व तोच पाकिस्तान भारताला आजही   त्रासदायक ठरत आहे. व भविष्यात हि ठरत राहील .  गेल्या सात दशकापासून चालू असलेला काश्मीरचा विषय  सुद्धा ह्याच प्रश्नाचा एक भाग आहे . अर्धा काश्मीर पाकिस्थानच्या ताब्यात आहे आणि जो काश्मिर आपल्या ताब्यात आहे तेथील मुसलमान  विलप्त काश्मीरची मागणी करत आहेत  किंवा पाकिस्थानात समाविष्ट होण्याचा मानस दाखवत आहेत .  ह्याच बरोबर दुसरे उदाहरण देता येते ते ईशान्यभारतातील नागालँड ह्या राज्याचे. स्वा. सावरकरांनी श्रद्धानंद मध्ये ९-८-१९३१ह्या दिवशी एक लेख लिहला होता त्या लेखाचे शीर्षक “हिंदु नाग लोक क्रिश्चन का होतात?” हा प्रश्न सावरकर हिंदु जनतेला , हिंदुपंडितांना , तत्कालीन शंकराचार्य वल्लभाचार्य ह्यांना विचारतात , मिशनरी इथे सातासमुद्रापार येतात धर्मप्रसार करतात ते काय मूर्ख आहेत?? केवळ धर्म प्रसार हा त्यांचा हेतू नसून ह्याच्यामागे काहीतरी वेगळा हेतू आहे . असे सावरकरांचे म्हणणे होते. ह्या लेखातून सावरकर हिंदुधर्मातील धर्मगुरूंना नागालँडमध्ये जाऊन नागा लोकांना हिंदुधर्माच्या छत्रछायेत घेण्याचे आवाहन करत आहेत. परंतु हिंदु समाजाची इतिकी दूरदृष्टी नव्हती पुढे ८०च्या दशकात सावरकरांनी दिलेला इशारा खरा ठरला आणि नागालँडमधील ९०% पेक्षा जास्त लोकसंख्या क्रिस्ती होऊन विलप्त राष्ट्रवाद उदयास आला . व त्यासाठी दहशदवादीकारवाया सुद्धा होऊ लागल्या.
 
   म्हणजेच सावरकरांच हिंदुत्व उपासनापद्धत पाहत नाही , ते आध्यात्मिक तसेच धार्मिकश्रद्धेला धरून ही नाही आहे. तर ते हिंदु नावाच्या लोकांचे न्यायहक्करक्षण करण्यासाठी व भारताचे राष्ट्रीयत्व राखण्यासाठी आहे  .तुम्ही वैदिक ,भारतीय बौध्द ,जैन ,शिख ,लिंगायत ब्राम्होसमाजी ,आर्यसमाजी इतकंच काय जडवादी चर्वाक असाल तरी तुम्ही हिंदूच ठराल . तसेच मुस्लीम तसेच क्रिस्ती हे जरी सावरकरांच्या हिदुत्वाच्या व्याख्येत बसत नसले  तरी काही अपवाद मात्र दिसून येतात उदाहरणार्थ भारताचे महान वैज्ञानिक तसेच माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दूल कलाम हे सावरकरांच्या व्याख्येनुसार हिंदूच ठरतात. कारण ते जन्माने जरी मुसलमान असले तरी त्यांची पितृभूमी हि भारत आहे तसेच ह्या देशावर त्यांनी  पुण्यभूमी समजून प्रेम केल तसच आपल संपूर्ण आयुष्य अर्पण केल. म्हणूनच पितृभूमी व पुण्यभूमीच्या व्याख्येनुसार ते हिंदुच ठरतात. म्हणूनच  सावरकरवादी हिंदुत्व हे राष्ट्रवादाचे खरे प्रतिक आहे . कारण जो ह्या भारत भूमीला पितृभूमी म्हणून तसेच पुण्यभूमी समजून प्रेम करेल तो हिंदुच ठरेल. तसेच त्याचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व म्हणजेच भारतीयत्व ठरेल .

      वन्दे मातरम                             
                                    

                                    तन्मय पाटील
                                
                        भ्रमण ध्वनी क्र. :- 9049455619/ 8850505942

                  Email ld :-Tanmaypatil.patil81 @Gmail.com

        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा